विधानसभा अध्यक्ष शंकरराव जगताप || Vidhansabha Aadhaksh Shankarrao Jagtap

Vidhansabha Aadhaksh Shankarrao Jagtap

महाराष्ट्र विधानसभेच्या सिंहासनावरचा बलुतेदार कोणी पुसला?
दिवंगत शंकरराव जगताप यांच्या विस्मृती मागे कोण?Vidhansabha Aadhaksh Shankarrao Jagtap

Vidhansabha Aadhaksh Shankarrao Jagtap

वर्णव्यवस्थेच्या विषारी सावल्यांनी ज्यांच्या सावलीलाही विटाळ मानला, बारा बलुतेदारांच्या यादीत ज्यांचे नाव वस्तऱ्याच्या पात्याइतके बोथट करून टाकले, त्या नाभिक समाजात एक माणूस जन्माला येतो. त्याच्या हातात ना कुळाचे नाव, ना घराण्याची पुण्याई, ना पैशाचे पोते. असते ती फक्त काळ्या दगडावर घासून निघालेल्या इमानाची धार. आणि तीच धार घेऊन तो उभा राहतो. सभागृहाच्या सिंहासनापर्यंत पोहोचतो. “288 आमदारांच्या डोक्यावर बसून राज्यघटनेचा लगाम हातात घेतो.” हे स्वप्न नाही. हे रक्तामांसाचे सत्य आहे. नाव – विधानसभा अध्यक्ष शंकरराव चिमाजी जगताप.Vidhansabha Aadhaksh Shankarrao Jagtap

शंकरराव जगतापांचा राजकीय प्रवास

शंकररावांचा जन्म कोरेगाव तालुक्यातील वाघोली या छोट्याशा गावात. आईच्या पदराला धरून शाळेत गेलेला पोरगा वाईच्या महाविद्यालयात पोहोचतो. तिथे पुस्तकांच्या पानांतून जग पाहतो. कायद्याची पदवी घेतो आणि काळा कोट चढवतो. पण कायद्याची पुस्तके वाचणाऱ्या त्या तरुणाला कळून चुकते की या देशात न्याय फक्त कायद्याच्या पुस्तकात आहे, रस्त्यावर नाही. अन्यायाची जळमटे झटकण्यासाठी काळा कोट पुरेसा नाही, त्यासाठी राजकारणाच्या आखाड्यात उतरावे लागते. म्हणून तो वकिलीच्या शांत खोलीतून बाहेर पडतो. सातारा जिल्हा परिषदेच्या पायऱ्या चढतो. तिथे उपाध्यक्ष होतो. फाटक्या आभाळाला ठिगळ लावण्याचे काम सुरू करतो. गावगाड्याने ज्याला वस्तऱ्यापुरते मर्यादित ठेवले होते, तोच माणूस जिल्ह्याच्या नियोजनाचे कागद हाताळू लागतो. ही बंडखोरी होती. व्यवस्थेविरुद्धची शांत, पण धारदार बंडखोरी.Vidhansabha Aadhaksh Shankarrao Jagtap

खुल्या प्रवर्गातून विजय

1978 साल उजाडते. कोरेगावच्या मातीतून एक आवाज घुमतो. तो आवाज जातीचा नाही. तो आवाज कर्तृत्वाचा असतो. आणि काय चमत्कार घडतो! सर्व समाजघटक एक होऊन मत देतात. खुल्या मतदारसंघातून, कुठल्याही राखीव चौकटीशिवाय, शंकरराव जगताप निवडून येतात. 1978, 1990 आणि 1995 – तीन वेळा. 1980 ची निवडणूक हरले तरी पक्षाने त्यांची गुणवत्ता पारखली. हे काय होते? हे समतेचे रणशिंग होते. हे विद्रोहाचे सनदशीर उत्तर होते. ज्या समाजव्यवस्थेने शतकानुशतके माणसामाणसात भिंती उभ्या केल्या, त्या भिंतींना एका माणसाने मतपेटीतून सुरुंग लावला होता.Vidhansabha Aadhaksh Shankarrao Jagtap

शंकरराव जगताप यांनी केवळ निवडणुका जिंकल्या नाहीत, तर माणसे जोडली. सर्व जात-धर्माच्या कार्यकर्त्यांना, सामान्य माणसांना घेऊन त्यांनी एक मोट बांधली. ती मोट म्हणजे चळवळ होती. त्या चळवळीत गरीब शेतमजूर होता, शाळेचा मास्तर होता, बाजारात भाजी विकणारी माय होती, आणि जिल्हा परिषदेचा अधिकारीही होता. सगळ्यांना वाटायचे – शंकरराव आपले आहेत. ही भावना त्यांनी निर्माण केली. तीच त्यांची खरी ताकद होती.

Vidhansabha Aadhaksh Shankarrao Jagtap

महाराष्ट्र नाभिक महामंडळाची स्थापना

पण ज्या समाजातून आलो, त्याचेही काही देणे आहे ही जाणीव त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणूनच त्यांनी खटावचे भूमिपुत्र “हनुमंतराव साळुंखे” यांच्या नेतृत्वाखाली आणि जननायक, “भारतरत्न कर्पुरी ठाकूर” यांच्या मार्गदर्शनाखाली “महाराष्ट्र नाभिक महामंडळ” ही पालक संघटना उभारली. कर्पुरी ठाकूर तेव्हा मुख्यमंत्री नव्हते. पदावरून पायउतार झालेले जननायक होते. तरीही ते या महामंडळाच्या राज्य अधिवेशनाला आवर्जून उपस्थित राहिले. एका राज्याचा माजी मुख्यमंत्री दुसऱ्या राज्यातील बलुतेदार समाजाच्या व्यासपीठावर येतो, ही घटना सामाजिक इतिहासातील सुवर्णक्षण होती. हीच ती काँग्रेसची आणि समाजवादी चळवळीची बांधिलकी होती. हनुमंतराव साळुंखे तात्यांनी ती संघटना अखेरच्या श्वासापर्यंत वाढवली.Vidhansabha Aadhaksh Shankarrao Jagtap

पक्षाच्या एका निर्णयामुळे उलथापालथ

आणि मग 20 मार्च 1985. महाराष्ट्राच्या इतिहासातला महत्त्वाचा दिवस. काँग्रेस पक्षाच्या एका निर्णयाने सगळी गणिते उलथीपालथी होतात. एका नाभिक समाजाच्या लेकाला, एका बलुतेदाराच्या पोराला, विधानसभेच्या अध्यक्षपदावर बसवले जाते. ज्या सभागृहात पेशवाईच्या खुणा होत्या, जिथे घराणेशाहीचे तोरे मिरवले जायचे, तिथे वस्तरा चालवणाऱ्याच्या हातात सत्तेचा दंडुका येतो. 1985 ते 1990. सलग पाच वर्षे. शिवाजीराव पाटील निलंगेकर, शंकरराव चव्हाण, शरद पवार असे तीन मुख्यमंत्री. विरोधी बाकांवर मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, छगन भुजबळ यांच्यासारखी वादळे. पण अध्यक्षांच्या आसनावर बसलेला माणूस डगमगत नाही. तो पक्षाचा नसतो, तो सभागृहाचा असतो. तो सत्तेचा नसतो, तो राज्यघटनेचा असतो. हे तो कृतीतून दाखवतो. नव्या आमदारांना बोलावून शिकवतो – तारांकित प्रश्न कसा विचारायचा, लक्षवेधी कशी मांडायची, शून्य प्रहराचा वापर कसा करायचा. `विधानसभा ही वादाची जागा नाही, विकासाची आहे` हे त्याचे सूत्र होते.Vidhansabha Aadhaksh Shankarrao Jagtap

बाळासाहेब ठाकरे यांना शंकरराव जगताप समजले

एक प्रसंग आठवतो. 2012 साल. भाई कोतवाल यांचे जन्मशताब्दी वर्ष. माथेरानचे सुपुत्र, नाभिक समाजात जन्मलेले आणि वयाच्या तिसाव्या वर्षी इंग्रजांच्या गोळ्या झेलून हुतात्मा झालेले भाई कोतवाल. त्यांच्या स्मरणार्थ आम्ही औरंगाबादला गेलो. तत्कालीन मंत्री राजेश टोपे आणि खासदार चंद्रकांत खैरे यांना भेटलो. पुस्तक भेट देऊन शासकीय कार्यक्रमाची मागणी केली. आम्ही नाभिक समाजाचे भाई कोतवाल असा उल्लेख करताच चंद्रकांत खैरे थांबले. त्यांनी विचारले, अरे, शंकरराव जगताप कोणत्या समाजाचे होते माहिती आहे का? आम्ही हो म्हणालो. पुढे खैरे म्हणाले,आम्ही जेव्हा पहिल्यांदा आमदार झालो, तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावले. म्हणाले, सभागृहात कसे वागायचे, प्रश्न कसे विचारायचे, हे शिकायचे असेल तर जा, शंकरराव जगताप यांच्याकडे प्रशिक्षण घ्या. शंकरराव काँग्रेसचे, आम्ही शिवसेनेचे. तरी बाळासाहेब सांगतात की त्यांच्याशिवाय दुसरा मास्तर नाही! तेव्हा कळले शंकररावांची उंची काय होती.Vidhansabha Aadhaksh Shankarrao Jagtap

शंकरराव जगतापांचा विसर

आज त्याच शंकरराव जगताप यांना विधिमंडळ विसरले. त्यांना घडवणारे विसरले. विरोधक विसरले. समकालीन विसरले. 24 जानेवारी 2013 रोजी वयाच्या 87व्या वर्षी ते गेले. तेव्हा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, जगताप हे गांधीवादी विचाराचे नेते होते. 1972 च्या दुष्काळातील त्यांचे काम उल्लेखनीय होते.` माजी आमदार मदन भोसले म्हणाले, `ते युवकांसाठी रोल मॉडेल होते. पण मग सत्य वेगळेच आहे – सातारा जिल्ह्यात, कोरेगावात, वाघोलीत, किंवा खुद्द विधानभवनात त्यांच्या जयंतीला, स्मृतिदिनाला साधी श्रद्धांजली वाहिली जात नाही. त्यांचा छोटा पुतळा तरी साताऱ्यात किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठे दिसत नाही. विधिमंडळाने त्यांचा साधा फोटो लावण्याचे धाडसही दाखवलेले नाही.Vidhansabha Aadhaksh Shankarrao Jagtap

आलुतेदार बलुतेदार भाजपसोबत

आणि इथेच आजच्या राजकारणाचा खरा चेहरा उघडा पडतो. आज ओबीसी समाज, लहान समाज, अलुतेदार-बलुतेदार समाज संघ-भाजपच्या मागे जातो, असा टाहो फोडला जातो. पारंपरिक मतदार सोडून का गेले यावर कपाळाला हात लावला जातो. पण आरसा कोणी पाहिलेला नाही. उत्तर शंकरराव जगताप यांच्या विस्मृतीत दडले आहे.Vidhansabha Aadhaksh Shankarrao Jagtap

एक काळ होता. साठ-सत्तर-ऐंशीचे दशक. तेव्हा ओबीसी समाज काँग्रेसच्या झेंड्याखाली एकवटला होता. कारण तेव्हा समतेचा अर्थ कळत होता. यशवंतराव चव्हाण यांनी 1 मे 1962 रोजी सातारा जिल्हा परिषदेची स्थापना केली आणि तळागाळातील माणसाला सत्तेत वाटा दिला. किसन वीर यांनी ग्रामीण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था उभी केली. त्याच विचारांच्या मुशीतून शंकरराव जगताप घडले. त्यांना संधी दिली गेली, हे नाकारता येणार नाही. पण मग पुढे काय झाले? ज्या विचाराने शंकररावांना घडवले, त्याच विचाराने त्यांना विसरून कसे चालेल?

सत्य कडवट आहे.

`ओबीसींच्या नावाने` सत्तेत आलेल्या पक्षांनी आणि त्यांच्या समविचारी संघटनांनी आजतागायत महाराष्ट्रात नाभिक समाजाच्या एकाही कार्यकर्त्याला विधानसभेची उमेदवारी दिलेली नाही. निवडून आणणे तर दूरच राहिले. निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेण्याची इच्छाशक्तीही दिसत नाही. साध्या शासनाच्या एखाद्या समितीवरही नाभिक समाजाच्या व्यक्तीला संधी मिळत नाही. कारण डोळ्यावर वर्णव्यवस्थेची झुल अजूनही घट्ट आहे. `समरसता` हे शब्दात आहे, कृतीत नाही.Vidhansabha Aadhaksh Shankarrao Jagtap

एकही नाभिक आमदार नाही

जर ओबीसींच्या जिवावर सत्ता उपभोगणाऱ्यांना एकाही नाभिकाला आमदार करण्याची क्षमता किंवा इच्छाशक्ती नसेल, तर ते ओबीसींच्या बाजूचे कसे? ज्या व्यवस्थेने 1985 साली एका बलुतेदाराला थेट अध्यक्षपदाच्या सिंहासनावर बसवले, त्या व्यवस्थेलाच विसरले गेले. आणि ज्यांनी आजवर एकही नाभिक उमेदवार दिला नाही, त्यांच्या ओबीसी प्रेमाच्या भूलथापांना बळी पडले गेले. हीच खरी शोकांतिका आहे. कुठे विधानसभेचे अध्यक्षपद, आणि कुठे आज नाकारलेला समाज! यावरूनच कळते – वर्णव्यवस्था गेली का? की एक नव्या रुपात पुन्हा आली?Vidhansabha Aadhaksh Shankarrao Jagtap

शंकरराव जगतापांचा फोटो ही नाही

1985 साली जो धाडसी निर्णय घेतला गेला, तो निर्णय घेण्याची हिंमत आजच्या कुठल्याही व्यवस्थेत आहे का? नाही. कारण आज उमेदवारी देताना कर्तृत्व पाहिले जात नाही, जातीची बेरीज, पैशाचे पोते, घराण्याचे नाव पाहिले जाते. शंकरराव जगताप यांच्याकडे यातले काहीच नव्हते. होते फक्त कर्तृत्व. म्हणून ते त्या काळात बसले. आजच्या काळात ते अनफिट ठरले असते.Vidhansabha Aadhaksh Shankarrao Jagtap

इथे छोट्या-मोठ्या नेत्यांचे पुतळे उभे राहतात. त्यांच्या नावाने स्मारके होतात. शाळा, संस्था, कारखाने, सूतगिरण्या निघतात. पण शंकरराव जगताप यांच्यासारख्या महान माणसाचा साधा फोटो नाही, पुतळा नाही, अभिवादनाचा कार्यक्रम नाही. त्यांच्यावर साधे एक पुस्तक काढण्याचे धाडस महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ किंवा विधिमंडळ सचिवालय करत नाही. यापेक्षा मोठे दुर्दैव काय असावे? विशेष म्हणजे, शंकरराव जगताप यांची नोंद ना गुगलवर व्यवस्थित आहे, ना समाजमाध्यमांवर. कुठे त्यांचे नाव बदलले गेले आहे, कुठे आडनाव बदलले आहे, कुठे तर समाजच बदलून टाकला आहे. अशा विकृत पद्धतीने शंकररावांच्या आठवणी पुसण्याचे काम येथील व्यवस्थेने केले आहे.

मग ओबीसी समाजाने काय करायचे?

मग ओबीसी समाजाने काय करायचे? ज्या विचाराने एकेकाळी त्याला मुख्य प्रवाहात आणले, त्याच विचाराने त्यांच्या महापुरुषांना विस्मृतीच्या गर्तेत लोटले. आणि ज्या विचाराने कधी त्यांना जवळ केले नाही, त्यांच्या दारात उभे राहायचे? हा जाब आहे. `छोट्या माणसाने मोठे व्हावे` हा विचारच गुंडाळून ठेवला गेला आहे. आणि वर ओबीसी समाज मत का देत नाही, अशी बोंब मारली जाते.Vidhansabha Aadhaksh Shankarrao Jagtap

शंकरराव जगताप यांचे कार्य, कर्तृत्व आणि गुणवत्ता पाहून त्यांना नेतृत्व करण्यासाठी ज्या ज्या महामानवांनी, कार्यकर्त्यांनी, मान्यवरांनी कष्ट घेतले, आज खऱ्या अर्थाने त्यांच्याच जिवंतपणातून शंकररावांच्या आठवणी जागृत आहेत. पण या आठवणी फक्त चार भिंतींत राहून चालणार नाहीत. या आठवणी येणाऱ्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी, लहान समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि लोकशाहीची चौकट बळकट करण्यासाठी शंकररावांच्या कार्याला उजाळा देणे अत्यंत गरजेचे आहे. त्यांना दिलेली संधी ही गावागावातल्या लहान समाजाच्या माणसाच्या मनावर बिंबवणे गरजेचे आहे. तेव्हा कुठे ओबीसी समाजातील छोटा-मोठा घटक लोकशाही वाचवण्याच्या विचाराच्या बाजूने उभा राहील. वर्णव्यवस्था, विषमतावाद, मनुस्मृती यापासून दूर होऊन लोकशाहीच्या बाजूने खंबीरपणे उभा राहील.

बलुतेदाराला विसराल तर महाराष्ट्र विसराल!

आता शेवटचा सवाल. ज्या विचाराने बलुतेदाराला अध्यक्ष केले त्याला विसरले गेले. आणि ज्यांनी एकही नाभिक आमदार दिला नाही त्यांना डोक्यावर घेतले गेले. ही चूक सुधारता येईल का? पुन्हा असा नेता घडवता येईल का? शंकरराव जगताप यांची उणीव भरून काढता येईल का? त्यांच्या आठवणींचे स्मृतिग्रंथ, त्यांच्या कार्याचे वस्तुसंग्रहालय, त्यांच्या नावाचे अभ्यासकेंद्र उभारता येईल का? की त्यांना फक्त निवडणुकीपुरते आठवून पुन्हा विस्मृतीच्या गर्तेत ढकलले जाईल?Vidhansabha Aadhaksh Shankarrao Jagtap

विधानसभेच्या त्या बलुतेदाराला विसराल, तर महाराष्ट्र विसराल. कारण शंकरराव जगताप म्हणजे फक्त एक माणूस नाही. तो महाराष्ट्राच्या समतेच्या लढ्याचा, विद्रोहाचा, आणि स्वीकाराचा जिवंत दस्तऐवज आहे. त्याला फाडून फेकाल, तर इतिहास माफ करणार नाही.

एड गोविंद दळवी, नांदेड

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top